राज्यात हवामानात उलथापालथ; सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

    28-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामानात अचानक बदल दिसून येत असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.

आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून उकाड्यात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. उद्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि नांदेड या भागांत वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.

सोमवारपासून पावसाचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांसह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींची शक्यता आहे. बुधवारीही हेच वातावरण कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.