अशोक खरात यांचे अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा

    28-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अहिल्यानगर: भोंदूगिरीच्या आडून महिलांवर अत्याचार केल्याच्या अशोक खरात प्रकरणात आता नवीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संवेदनशील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पीडित महिलांची ओळख उघड होईल अशा पद्धतीने व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कोपरगावमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी कोपरगावमधील एका व्हॉट्सॲप गटावर संबंधित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच तातडीने तपास सुरू करण्यात आला आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत या व्हिडिओंची साखळी उघडकीस आली असून, एकमेकांना फॉरवर्ड करत हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरवले जात असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी राहुल शिंदे, योगेश आढाव आणि संदीप गर्जे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी संदीप गर्जे अद्याप फरार आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे संवेदनशील व्हिडिओ फॉरवर्ड करणे, साठवणे किंवा प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोणाकडेही असे व्हिडिओ असल्यास ते त्वरित डिलीट करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.