
Image Source:(Internet)
नागपूर : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जगभरात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना काही भागांत पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र समोर आलं आहे. यासोबतच घरगुती गॅसच्या उपलब्धतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. लॉकडाऊनबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या असून काही जण हेतुपुरस्सर भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्यात गॅस टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून उपाययोजना वेगाने राबवल्या जात आहेत. घराघरात पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याच्या योजनेला गती देण्यात येत असून महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. यामुळे सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होऊन भविष्यातील अडचणी टाळता येतील, असा सरकारचा विश्वास आहे.
प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करत कोणत्याही अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे. सध्या देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.