मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सायबर फसवणूक; आरोपी अटकेत, ६ लाखांचा गंडा

    28-Mar-2026
Total Views |

मुंबई : सायबर गुन्हेगारीचा विळखा आता सामान्य नागरिकांपुरता मर्यादित नसून थेट न्यायव्यवस्थेलाही फटका बसत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील एका कार्यरत न्यायाधीशांची तब्बल ६.०२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा येथून २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी मजहर आलम इस्राएल मिया याने क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्याच्या बहाण्याने अत्यंत चलाखीने हा गुन्हा केला. विशेष म्हणजे, पकड टाळण्यासाठी त्याने विविध राज्यांतून घेतलेल्या अनेक सिम कार्डचा वापर करून प्रत्येक गुन्ह्यानंतर ती निष्क्रिय केली. तपासात त्याचा संबंध देशभरातील किमान १० राज्यांतील ३६ फसवणूक प्रकरणांशी असल्याचे उघड झाले आहे.

घटनेची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी झाली. न्यायाधीशांनी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्ससाठी अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑनलाइन मिळालेला बनावट हेल्पलाइन नंबर त्यांच्या अडचणीचे कारण ठरला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांचे सोंग घेत विश्वास संपादन केला.

यानंतर व्हॉट्सॲपवरून १८ एमबीची धोकादायक APK फाईल पाठवण्यात आली. आयफोनवर ही फाईल उघडता न आल्याने आरोपींनी अँड्रॉइड फोन वापरण्याचा सल्ला दिला. त्यानुसार न्यायाधीशांनी दुसऱ्या फोनमध्ये सिम टाकून ॲप डाउनलोड केले आणि त्यात क्रेडिट कार्डची माहिती भरली. काही मिनिटांतच चार व्यवहारांद्वारे ६.०२ लाख रुपये खात्यातून काढण्यात आले.

फसवणूक लक्षात येताच न्यायाधीशांनी तात्काळ कार्ड ब्लॉक करून सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली. त्यानंतर कफ परेड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८, ३१९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
जामतारा सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास, डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण आणि निगराणीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपीने फसवणुकीची रक्कम विविध ऑनलाइन वॉलेट्स आणि मल्टी-लेयर ट्रान्झॅक्शनद्वारे फिरवल्याचे उघड झाले. त्यातील सुमारे ४ लाख रुपये एका ॲमेझॉन वॉलेटमध्ये गोठवण्यात आले असून उर्वरित रकमेचा माग घेतला जात आहे.

या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून तपास सुरू आहे. जामतारा पॅटर्नप्रमाणे बनावट हेल्पलाइन, फिशिंग आणि मालवेअर ॲप्सच्या माध्यमातून लोकांची आर्थिक माहिती चोरण्याची ही पद्धत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सावधान! तज्ज्ञांचा इशारा
ऑनलाइन हेल्पलाइन क्रमांक शोधताना अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, अज्ञात लिंकवरून ॲप डाउनलोड करू नये आणि कोणतीही बँकिंग माहिती शेअर करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.