Image Source:(Internet)
नागपूर :
वैद्यकीय भाषेत ‘सेरेब्रल व्हॅस्क्युलर अपघात’ म्हणून ओळखला जाणारा ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) हा मेंदूशी संबंधित गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. मेंदूपर्यंत पोहोचणारा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अचानक कमी किंवा बंद झाल्यास स्ट्रोक होतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाला अर्धांगवायू किंवा मृत्यूचाही धोका संभवतो.
तज्ज्ञांच्या मते, स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या एक ते दोन तासांत रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेळेत उपचार मिळाल्यास जीव वाचवण्याची आणि गंभीर परिणाम टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
लक्षणे कशी ओळखाल?
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे अचानक दिसून येतात. श्वास घेण्यास त्रास होणे, दृष्टी धूसर होणे, बोलण्यात अडचण येणे, चालताना तोल जाणे, चेहऱ्याचा किंवा शरीराच्या एका बाजूचा भाग सुन्न होणे किंवा कमकुवत होणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत. अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
कोणाला जास्त धोका?
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका अधिक असतो. तसेच धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांनाही हा धोका वाढतो. वय वाढल्यास स्ट्रोकची शक्यता अधिक वाढते, मात्र हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.
प्रतिबंधासाठी काय कराल?
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, संतुलित आहार घेणे, ताजी फळे-भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करणे, नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर नियमित औषधे घेणे आवश्यक आहे.
ब्रेन स्ट्रोक हा अचानक येणारा पण योग्य वेळी उपचार केल्यास नियंत्रित करता येणारा आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे ओळखून त्वरित रुग्णालयात जाणे हाच जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.