नागपूर बारावी पेपरफुटी प्रकरण; अतिरिक्त लिफाफ्याचा गैरवापर ठरला घोटाळ्याचा मुख्य धागा

    27-Mar-2026
Total Views |

नागपूर : बारावीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांच्या पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपासातून अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. परीक्षा केंद्रांना दिल्या जाणाऱ्या ‘अतिरिक्त लिफाफ्या’चा गैरवापर करूनच प्रश्नपत्रिका आधीच उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप बाबुराव सराटकर (वय ४६) हा चरणदास प्राथमिक शाळेतील शिक्षक असून जयताळा येथील विद्यासाधना कॉन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा संचालक व अध्यक्ष आहे. आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेत त्याने हा संपूर्ण प्रकार रचल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सराटकरने आपल्या संस्थेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर दबाव टाकत त्याची मदत घेतली. याच कर्मचाऱ्याने सर्वप्रथम प्रश्नपत्रिका उघडून बाहेर पाठवण्याचे काम केल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांनुसार, प्रश्नपत्रिका २५ प्रतींच्या सीलबंद लिफाफ्यांमध्ये दिल्या जातात आणि प्रत्येक २५ लिफाफ्यांमागे एक अतिरिक्त लिफाफा राखीव ठेवला जातो. हा लिफाफा केवळ आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर उघडणे बंधनकारक असते. मात्र, तपासात उघड झाल्याप्रमाणे, सराटकरने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे अर्धा तास आधीच हा अतिरिक्त लिफाफा गुपचूप उघडला.

यानंतर संबंधित शिपायाच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते काही कोचिंग क्लास चालकांकडे पाठवण्यात आले. अल्पावधीतच ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. अटक केलेल्यांमध्ये शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचे आरोपपत्र येत्या आठवड्यात न्यायालयात सादर होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.