तृतीयपंथी महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीतील कथित व्हिडिओ व्हायरल; मंत्री झिरवळांभोवती वादाचे वादळ!

    27-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका कथित व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एका तृतीयपंथी महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत झिरवळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू केली आहे. काँग्रेसने हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत तातडीने कारवाईची गरज व्यक्त केली आहे. संबंधित व्हिडिओमध्ये मंत्री त्यांच्या अधिकृत निवासस्थानी असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

दुसरीकडे, नरहरी झिरवळ यांनी हे सर्व आरोप नाकारत व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हा प्रकार रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “अशा घटनांमुळे सार्वजनिक जीवनातील मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” असे सांगत चौकशीची मागणी केली आहे. तसेच संबंधित मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची मागणीही त्यांनी केली.

या घडामोडींमुळे झिरवळ यांच्यावरचा राजकीय दबाव वाढत चालला असून त्यांच्या पुढील निर्णयाबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, वाद उफाळल्यानंतर झिरवळ सार्वजनिकरित्या फारसे दिसत नसल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या प्रश्नांना टाळत ते पक्ष नेतृत्वाशी संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.