छिंदवाड्यात भीषण अपघात; बस उलटून १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
27-Mar-2026
Total Views |

Image Source:(Internet)
छिंदवाडा: जिल्ह्यातील उमरानाला परिसरात गुरुवारी संध्याकाळी एक भीषण रस्ते अपघात घडला. पिकअप वाहनाला धडक दिल्यानंतर बसवरील नियंत्रण सुटून ती उलटली. या दुर्घटनेत १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४० ते ४७ प्रवाशांना घेऊन ही बस छिंदवाडा ते उमरानाला मार्गावर प्रवास करत होती. सिमरिया परिसरात एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या लसूण भरलेल्या पिकअपशी जोरदार धडक झाली. अपघातानंतर बस पलटी झाल्याने मोठी जीवितहानी झाली.
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. अनेकांना हात-पाय तुटणे तसेच डोक्याला गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी घटनेची पुष्टी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींना तातडीने योग्य उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.