
Image Source:(Internet)
गोंदिया : शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात अन्नातून विषबाधेची गंभीर घटना उघडकीस आली असून ३५ विद्यार्थिनींना अचानक त्रास झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व विद्यार्थिनींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या या महाविद्यालयात सुमारे १८५ विद्यार्थिनी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधूनच जेवणाची सोय केली जाते. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर काही विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी, उलट्या यांसारखा त्रास सुरू झाला.
सुरुवातीला काही विद्यार्थिनींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळपर्यंत हा त्रास वाढत गेला आणि एकाचवेळी ३५ विद्यार्थिनींमध्ये समान लक्षणे दिसू लागली. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू केले.
घटनेनंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे कॅन्टीनमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून महाविद्यालय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.