रामनवमी निमित्त नागपुरात ऐक्याचा संदेश; शोभायात्रेला मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत

    26-Mar-2026
Total Views |
 
Muslim brothers
 
नागपूर : रामनवमीच्या (Ram Navami) पवित्र सणानिमित्त महेंद्र नगर येथील प्राचीन शिप्ली माता मंदिरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत यंदा धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक ऐक्याचेही प्रभावी दर्शन घडले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
 
शोभायात्रेची सुरुवात मंदिरातील विधिवत पूजा आणि आरतीने झाली. ढोल-ताशांचा निनाद, ‘जय श्रीराम’च्या गजरात आणि आकर्षक झांक्यांनी सजलेली ही यात्रा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत होती. भगव्या पताकांनी सजलेले वातावरण आणि पारंपरिक वेशभूषेतील सहभागी भाविकांमुळे सर्वत्र उत्सवाची रंगत वाढली होती.
 
दरम्यान, प्रभाग क्रमांक 6 मध्ये पोहोचताच या शोभायात्रेला एक वेगळेच स्वरूप लाभले. स्थानिक नगरसेवक मुजतबा अंसारी यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजातील नागरिकांनी या यात्रेचे मनापासून स्वागत केले. फुलांची उधळण करत आणि स्वागतासाठी विशेष व्यवस्था करत त्यांनी बंधुभावाचा आदर्श ठेवला. या प्रसंगाने उपस्थितांच्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.
 
या वेळी बोलताना मुजतबा अंसारी यांनी सांगितले की, ही शोभायात्रा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आपल्या समाजातील एकात्मतेचे प्रतीक आहे. परस्परांच्या श्रद्धांचा आदर राखणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमातून नागपूरकरांनी पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराचा संदेश दिला असून, विविध धर्मांतील लोक एकत्र येऊन सण साजरे करण्याची परंपरा अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.