नागपुरात रामनवमी मिरवणुकीमुळे वाहतुकीत फेरबदल; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

    25-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : श्रीराम नवमीच्या निमित्ताने गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी रामनगर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीचा मार्ग शहरातील प्रमुख चौकांमधून जाणार असल्याने त्या भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. रामनगर चौकापासून सुरू होणारी ही मिरवणूक गोकुलपेठ, लक्ष्मीभवन, धरमपेठ, झेंडा चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, श्रद्धानंदपेठ, व्हीएनआयटी गेट, एलएडी चौक आणि तिडके चौक मार्गे पुन्हा राममंदिरात येऊन समाप्त होणार आहे.

या दरम्यान विविध टप्प्यांमध्ये वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गांकडे वळविण्यात येणार आहे. दुपारपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या वेळांमध्ये संबंधित रस्त्यांवर निर्बंध राहणार असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रविनगर, लॉ कॉलेज चौक, भोले पेट्रोल पंप चौक, अलंकार चौक, काचीपुरा, माताकचेरी, आरपीटीएस आदी मार्गांवरून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना दिलेल्या वेळेत मिरवणुकीच्या मार्गावर जाणे टाळण्याचे, शक्यतो पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.