
Image Source:(Internet)
मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात मोठा धक्का बसला असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये तब्बल १,४०० अंकांची घसरण झाली, तर निफ्टीही २२,७०० च्या खाली घसरला.
सकाळी सुमारे ९.२० वाजताच्या सुमारास सेन्सेक्स जवळपास १,३८० अंकांनी खाली येत ७३,१०० च्या आसपास व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टीतही सुमारे ४४० अंकांची घसरण होत तो २२,६७० च्या पातळीवर ट्रेड करताना दिसला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पडझडीमागे केवळ स्थानिक कारणे नसून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव बाजारासाठी मोठा धोका ठरत आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळत चालल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली आहे.
या संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर झाला असून तेलाचे दर प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. भारतासारख्या आयात-निर्भर देशासाठी ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या धोकादायक मानली जाते. त्यामुळेच शेअर बाजारावर दबाव वाढून मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे.