गॅस सिलिंडर बुकिंगचे नवे नियम लागू; आता ‘वेटिंग पिरीयड’ वाढला, ग्राहकांना प्रतीक्षा अनिवार्य

    25-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IndianOil) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करत नवीन ‘वेटिंग पिरीयड’ लागू केला आहे. या बदलाचा उद्देश गॅसची काळाबाजारी रोखणे आणि सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पुरवठा सुरळीत ठेवणे हा आहे.

नवीन नियमांनुसार, ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करता येणार नाही. म्हणजेच, सिस्टीमच लवकर बुकिंग स्वीकारणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नवीन कालमर्यादा काय?
एकच सिलिंडर असलेल्या ग्राहकांना आता पुढील बुकिंगसाठी किमान २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे, त्यांच्यासाठी ही मर्यादा ३५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवस थांबावे लागणार आहे.

छोट्या सिलिंडरसाठीही नियम कडक
५ किलो आणि १० किलोच्या छोट्या सिलिंडरसाठीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ५ किलो सिलिंडरसाठी ९ ते १६ दिवसांचे अंतर आवश्यक असेल, तर १० किलो सिलिंडरसाठी १८ ते ३२ दिवसांचे अंतर बंधनकारक आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, ही कालमर्यादा बुकिंगच्या तारखेपासून नव्हे तर सिलिंडरच्या प्रत्यक्ष डिलिव्हरीच्या तारखेपासून मोजली जाणार आहे.

बदलामागील कारणे काय?
सरकार आणि गॅस कंपन्यांच्या मते, या नव्या नियमांमुळे घरगुती गॅसचा गैरवापर आणि काळाबाजारी रोखण्यास मदत होणार आहे. अनेकदा व्यावसायिक कारणांसाठी घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या निर्णयामुळे गरजू ग्राहकांना वेळेत गॅस मिळेल, तसेच पुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता येईल, असा दावा केला जात आहे. मात्र, विशेषतः शहरी भागातील दोन सिलिंडर कनेक्शन असलेल्या कुटुंबांना या नियमांचा काहीसा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.