मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बस सेवेचा शुभारंभ; राज्यभर ३ हजार आधुनिक बस धावणार

    25-Mar-2026
Total Views |
 
CM Devendra Fadnavis
 Image Source:(Internet)
 
मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रेरणादायी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत ‘राजमाता जिजाऊ’ (Rajmata Jijau) स्मार्ट बस सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत टप्प्याटप्प्याने सुमारे ३ हजार अत्याधुनिक बसेस राज्यभर धावणार आहेत.
विधान भवन परिसरात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला पारंपरिक ढोल-ताशे, झांजा आणि लेझीमच्या गजरात उत्साही वातावरण लाभले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बस सेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून महाराष्ट्राच्या विकास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम आहे. ही सेवा प्रवाशांना दर्जेदार, आरामदायी आणि प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव देईल.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ही सेवा राजमाता जिजाऊंच्या प्रेरणादायी वारशाला समर्पित आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या नव्या बस सेवेमध्ये अत्याधुनिक सुविधा, उच्च दर्जाची सुरक्षितता आणि विश्वासार्हता यावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘शिवनेरी’ आणि ‘शिवशाही’ बस सेवांचा वारसा पुढे नेत ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी या बसमधून प्रवास करत सुविधांची पाहणी केली. बसच्या पुढील भागात उभारण्यात आलेला राजमाता जिजाऊंचा पुतळा या सेवेचे सांस्कृतिक वैशिष्ट्य अधिक ठळक करतो.