नागपुरात बर्ड फ्लूची लागण; सेमिनरी हिल्स ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित!

    25-Mar-2026
Total Views |
-अंडी-चिकन विक्रीवर 21 दिवसांची बंदी

Bird flu Image Source:(Internet) 
नागपूर :
शहरात बर्ड फ्लूचा (Bird flu) संसर्ग आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील प्रादेशिक हॅचरीत तपासणीदरम्यान H5N1 (एव्हियन इन्फ्लुएंझा) विषाणू आढळल्याने आरोग्य विभागासह पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाग ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.
 
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हॅचरीभोवतीचा १ किलोमीटर परिसर बाधित म्हणून निश्चित करण्यात आला आहे, तर त्याच्या पुढील ९ किलोमीटर क्षेत्रात विशेष निगराणी ठेवली जाणार आहे.
 
संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवसांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या काळात कोंबड्या, इतर पक्षी तसेच अंडी यांच्या विक्री-खरेदीवर पूर्ण बंदी असेल. यासोबतच पक्ष्यांचे खाद्य, कुक्कुटपालनाशी संबंधित साहित्य आणि जिवंत पक्ष्यांच्या वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रभावित आणि निगराणी क्षेत्रात पक्ष्यांचे बाजार, प्रदर्शन किंवा मेळावे घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
दरम्यान, या आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. नितीन फुके यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याला सूचना दिल्या आहेत. मनपा व पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
 
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.