नागपुरात कौटुंबिक वादामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

    24-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: वाठोडा पोलीस ठाणे परिसरात एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहामुळे त्रस्त झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

माहितीनुसार, वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जयवंत झाडे यांनी स्वतःच्या घरीच विषप्राशन केले. ही बाब लक्षात येताच शेजारी राहणाऱ्या एका सहकारी पोलिसाने तातडीने त्यांना नंदनवन परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि प्रकृती गंभीर आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीशी सुरू असलेल्या वादामुळे ते मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली होते. कुटुंबीयांनीही घरात दीर्घकाळ तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेची वाठोडा पोलिसांकडून चौकशी सुरू असून, नेमके कारण शोधले जात आहे.