
Image Source:(Internet)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे. मार्च महिना संपत आला तरी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता हे दोन्ही हप्ते एकत्रित स्वरूपात देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तरीही, मागील काही काळापासून हप्ते उशिराने मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता देखील उशिराने फेब्रुवारीत जमा झाला होता. त्यामुळे सलग दोन महिन्यांचे पैसे प्रलंबित राहिल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांना १५ एप्रिलपूर्वी ही रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी आधी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती, त्यामुळे काहींचा लाभ थांबला होता.
या पार्श्वभूमीवर आता लाभार्थींना शेवटची संधी देण्यात आली असून, मार्चअखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित महिलांचा योजनेतील लाभ कायमचा बंद होऊ शकतो.