नागपूर जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा, अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी इटनकर यांचे आवाहन

    24-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर- जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्यावर प्रशासनाकडून काटेकोर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वरिष्ठ स्तरावरून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गरजेनुसारच इंधन खरेदी करावी, अनाठायी साठेबाजी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत असल्या तरी इंधन तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोणतीही घबराटीची परिस्थिती नसून नागरिकांनी शांतता राखावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून यापूर्वीच स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे नियमित आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवांबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर तसेच पुरवठ्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांच्या सहकार्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.