
Image Source:(Internet)
नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून मेघे यांनी राजकारणासोबतच शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.
प्रभावी राजकीय कारकीर्द-
दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. वर्धा लोकसभा मतदारसंघातून ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. याशिवाय त्यांनी लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांत सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच ते तीन वेळा विधान परिषद सदस्यही राहिले.
१९९१ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला, त्यानंतर १९९६ मध्ये रामटेक आणि १९९८ मध्ये वर्धा येथूनही ते खासदार झाले. तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांतून विजय मिळवणारे ते विदर्भातील मोजकेच नेते होते.
२०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश-
दीर्घकाळ काँग्रेसमध्ये कार्य केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक आणि निवडणूक कामकाजात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपद भूषवून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची भक्कम पायाभरणी केली होती.
शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील मोठा ठसा-
राजकारणाबरोबरच मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारले, ज्याचा मोठा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना झाला. विविध शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांनी विदर्भाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली.
साध्या कुटुंबातून आलेल्या मेघे यांनी आपल्या सौम्य स्वभाव, संयमी व मृदुभाषी व्यक्तिमत्त्वामुळे जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली.
गडकरींसोबत विशेष जिव्हाळा-
दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांच्यातील संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या परस्पर विश्वासाची अनेकदा चर्चा होत असे. आयुष्याच्या उत्तरार्धातही मेघे यांनी गडकरींवर असलेला विश्वास सार्वजनिकरित्या व्यक्त केला होता.
समर्थकांत शोककळा-
रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. अनेक कार्यकर्त्यांना घडवणारे आणि विदर्भाच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून दत्ता मेघे यांची ओळख कायम राहणार आहे.