महाराष्ट्रासह १५ राज्यांना हवामानाचा इशारा; वादळी पावसाचा ‘हाय अलर्ट’, पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता!

    23-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत अचानक हवामान बदलत आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा धोका वाढला असून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.

दरम्यान, राज्यात सध्या दुहेरी हवामान परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागांत पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर कोकण आणि किनारपट्टी भागात उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथे तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही हवामान बिघडले आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली (एनसीआर), उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्ये विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.