Image Source:(Internet)
यवतमाळ: पूर्व वैमनस्यातून एका निष्पाप ६ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बोथ (ता. दरवा) येथे घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि शोककळा पसरली आहे.
मृत मुलगी शिवानी पंकज जाधव (वय ६ वर्षे ८ महिने) हिचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह घरातील पलंगाखाली एका पोत्यात लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अपहरणानंतर हत्या; तपासात उलगडले सत्य-
शुक्रवार, २० मार्च रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे नातेवाईक निलेश नथुरसिंग जाधव यांनी दरवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध पथके तयार करून संशयित ठिकाणी झडती घेत असताना, मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या कैलाश जाधव यांच्या घरात संशयास्पद हालचाली आढळल्या.
पलंगाखाली पोत्यात मृतदेह-
झडतीदरम्यान घरातील पलंगाखाली एका पोत्यात शिवानीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने पोलिसांसह गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला.
पूर्व वैमनस्यातून गुन्हा-
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या वैमनस्यातून मुलीचे अपहरण करून तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लपवून ठेवला.
पाच जण अटकेत-
या प्रकरणी पोलिसांनी कैलाश विलास जाधव (३०), माला विलास जाधव (२६), सोनू विलास जाधव (३२), रंजना सोनू जाधव (३०) यांच्यासह कायद्याशी संघर्ष करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण बोथ गावासह यवतमाळ जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.