
Image Source:(Internet)
नागपूर : भांडेवाडी-बीडगाव परिसरात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडवली. एका फर्निचर कारखान्यातून सुरू झालेली ही आग काही क्षणांतच शेजारील गोदामांपर्यंत पोहोचली आणि तब्बल ८ गोदामे आगीत जळून खाक झाली.
माहितीनुसार, सकाळच्या सुमारास अचानक कारखान्यात आग भडकली. सुरुवातीला छोट्या स्वरूपात असलेली आग काही वेळातच विक्राळ झाली आणि आसपासच्या गोदामांमध्ये पसरली. या आगीत गोदामांमध्ये साठवलेला मोठ्या प्रमाणातील माल पूर्णपणे नष्ट झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या विविध केंद्रांमधून ९ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता पाहता आणखी मदतही मागवण्यात आली. दरम्यान, गोदामांमध्ये असलेल्या तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली आणि परिस्थिती आणखी गंभीर बनली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास चार तास अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.