नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

    23-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा हा किताब पटकावत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळवला.

या स्पर्धेचे आयोजन रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. समारोप सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही मल्ल एकाच आखाड्यात सराव करणारे आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असल्याने ही लढत अधिक रंगतदार ठरली. सुरुवातीपासूनच दोघांनीही आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. पहिल्या फेरीत १-१ अशी बरोबरी झाली होती.

दुसऱ्या फेरीत मात्र हर्षवर्धनने संयम राखत अचूक डावपेच राबवले. महेंद्रच्या आक्रमणांना अडवत त्याने निर्णायक क्षणी गुण मिळवले आणि अखेर ४-३ अशा फरकाने विजय मिळवत किताबावर नाव कोरले.

या स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर मात करत अंतिम फेरी गाठली होती, तर गादी विभागात हर्षवर्धनने जय पाटीलचा एकतर्फी १०-० असा पराभव करून अंतिम लढतीत प्रवेश केला होता.

समारोप प्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात विशेष क्रीडा शाळा सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, तसेच अनेक राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरच्या कामगिरीचे राज्यभरातून कौतुक होत असून, नाशिक जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.