समुद्री मार्ग सुरक्षित ठेवा, तणाव कमी करा; पंतप्रधान मोदींचे इराण राष्ट्राध्यक्षांना आवाहन

    21-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा शांततेचा मार्ग अवलंबण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेज़ेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करत प्रादेशिक स्थैर्य, व्यापार आणि मानवी सुरक्षेबाबत भारताची भूमिका ठामपणे मांडली.

या संवादादरम्यान पंतप्रधानांनी ईद-उल-फितर आणि नवरोजच्या शुभेच्छा देत, या सणांच्या निमित्ताने पश्चिम आशियात शांतता आणि समृद्धी नांदो, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, याचवेळी त्यांनी प्रदेशातील बिघडत चाललेल्या सुरक्षेच्या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीसारखे महत्त्वाचे समुद्री मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याची गरज अधोरेखित केली. या मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत, अशा घटनांमुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युद्धजन्य परिस्थितीमुळे निरपराध नागरिकांचे होणारे नुकसान आणि जीवितहानीबाबत पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेऊन भारत सातत्याने जागतिक नेत्यांशी संपर्क साधत आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी बहरीनचे राजे, कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांच्याशीही चर्चा केली आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीतूनच कोणताही वाद सोडवता येतो, ही भारताची भूमिका यावेळी पुन्हा स्पष्ट करण्यात आली.

एकीकडे अमेरिका आणि इस्रायलचा आक्रमक पवित्रा, तर दुसरीकडे इराणकडून ठाम भूमिका अशा पार्श्वभूमीवर भारत संतुलित आणि मध्यस्थीची भूमिका निभावत असल्याचे दिसून येत आहे.