
Image Source:(Internet)
बीड : राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धुमाकूळ घालत शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषत: फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री Pankaja Munde यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड, आष्टी, वडवणी आणि केज या तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेत मुंडे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. फळबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांमध्येही गारपीट झाल्याने काढणीस आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी पडली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर आणि खामगाव परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर काही भागात गारपीटही झाली. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या गारपीटीमुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. सरकारकडून जलद पंचनामे आणि मदत वितरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे.