एडीएफसी,पीएनबी अन् बंधन बँकेचे नवे नियम लागू

    21-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. एडीएफसी,पीएनबी अन् बंधन बँक यांनी त्यांच्या एटीएम व्यवहारांमध्ये आणि शुल्करचनेत बदल जाहीर केले असून, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

एचडीएफसी बँकेने यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढण्याच्या व्यवहारांना आता मोफत व्यवहार मर्यादेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठरलेली मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ₹23 शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी हे व्यवहार स्वतंत्र मानले जात होते, मात्र आता ते सामान्य एटीएम व्यवहारांप्रमाणेच गणले जाणार आहेत.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अनेक डेबिट कार्डधारकांसाठी दैनंदिन रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी केली आहे. काही कार्डांवरील मर्यादा ₹1 लाखांवरून ₹50 हजारांपर्यंत आणली असून, प्रीमियम कार्डांवरील मर्यादा ₹1.5 लाखांवरून ₹75 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना अनेक वेळा एटीएमचा वापर करावा लागू शकतो.

बंधन बँकेनेही एटीएम वापरासंदर्भातील नियमांमध्ये बदल करत मोफत व्यवहारांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारावर ₹23 आणि नॉन-आर्थिक व्यवहारावर ₹10 शुल्क आकारले जाणार आहे. तसेच खात्यात अपुरी शिल्लक असल्यास व्यवहार अयशस्वी ठरल्यावर ₹25 दंड आकारला जाणार आहे.

या सर्व बदलांमुळे एटीएम वापर अधिक खर्चिक होण्याची शक्यता असून, ग्राहकांनी व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरणार आहे.