
Image Source:(Internet)
जळगाव : मतदार यादी दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जळगाव शहरातील सात बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) अडचणीत आले असून, त्यांच्या विरोधात थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या वारंवार सूचना आणि बैठकीनंतरही अपेक्षित कामगिरी न झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात लवकरच मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरीक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तयारी वेगाने सुरू आहे. मतदारांची अचूक नोंद, जुन्या याद्यांतील पडताळणी, बीएलओ अॅपमध्ये मॅपिंग, चुकीची छायाचित्रे दुरुस्त करणे आणि डुप्लिकेट नोंदी हटवणे ही कामे सुरू आहेत. यासाठी शहरात ३५८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सात बीएलओंनी कामात गंभीर दिरंगाई केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
प्रशासनाने संबंधितांना अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या बैठकीतही कामगतीबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले होते. तसेच व्हॉट्सअॅपद्वारेही वारंवार स्मरण करून देण्यात आले. तरीही काहींनी काम सुरूच केले नाही, तर काहींची प्रगती अत्यल्प राहिली.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार शीतल राजपूत यांच्या सूचनेवरून निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या कारवाईत महानगरपालिका कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश असून, निवडणूक यंत्रणेत यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मतदार यादी अचूक ठेवणे ही लोकशाही प्रक्रियेची मूलभूत गरज असल्याने यापुढेही कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.