
Image Source:(Internet)
नाशिक :अशोक खरात या कथित भोंदूबाबाशी संबंधित प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा रंगली आहे. या वादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांच्या पदांवर परिणाम होणार का, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
भुजबळ यांनी सांगितले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी अंधश्रद्धेपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो, त्यामुळे त्यांच्या कृतींचा परिणाम व्यापक पातळीवर होत असतो. त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेशी नाव जोडण्यावर भाष्य-
चाकणकर यांचे नाव संबंधित संस्थेशी जोडले जात असल्याच्या चर्चांवर भुजबळ म्हणाले की, अनेकदा मोठ्या पदांवर असलेल्या व्यक्तींची नावे काही संस्था स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. संबंधित व्यक्तींना त्याची पूर्ण माहिती असेलच असे नाही. मात्र, अशा गोष्टींमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. श्रद्धा ठेवणे चुकीचे नाही, पण भोंदूगिरीला प्रोत्साहन मिळेल असे वर्तन टाळले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील पदावर निर्णय प्रलंबित-
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर आता चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर भुजबळांनी स्पष्ट केले की, आयोगाचे पद हे शासकीय असल्याने त्यावर सरकारने निर्णय घेतला. मात्र, पक्षातील जबाबदारीबाबत निर्णय हा पक्ष नेतृत्व आणि सुनेत्रा पवार यांच्या चर्चेनंतरच घेतला जाईल.
तपासानंतरच पुढील पाऊल-
राजीनाम्याबाबत घाई न करता वस्तुस्थिती समोर येऊ देणे गरजेचे असल्याचे भुजबळांनी नमूद केले. पोलीस तपास सुरू असून, सत्य समोर आल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.