
Image Source:(Internet)
नाशिक : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिवेशनापूर्वीच विशेष तपास पथक नेमण्यात आले होते, मात्र यात सरकारमधील अनेक मोठे चेहरे असल्याने प्रकरण बाहेर येऊ दिले गेले नाही, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात अशोक खरात यांच्याशी संबंधित संस्थेत रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, केवळ त्यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यात सामील असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले की, अधिवेशनापूर्वीच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. तरीही सरकारने याबाबत माहिती लपवून ठेवली. “निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण समोर आले,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
तसेच या प्रकरणात प्रशासकीय सेवांमधील वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी असल्याचा आरोप करत, “हे प्रकरण पोलिसांना आधीपासूनच माहिती होते, त्यामुळे ते बाहेर आले नाही,” असेही त्यांनी म्हटले. सरकारने केवळ राजीनामा घेऊन जबाबदारी झटकू नये, तर संपूर्ण सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमण्याची अचूक वेळ जाहीर करावी, तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.