पेट्रोल-डिझेल दर वाढणार? प्रीमियम इंधनाने आधीच घेतली झेप!

    20-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणेः राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असून काही शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत किरकोळ बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या मध्यपूर्वेतील तणावामुळे भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागांत किंमतीत झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार का, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र सध्याच्या स्थितीत सर्वत्र दरवाढ झालेली नसून काही ठिकाणी फक्त प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.

कुठे काय बदल?
सोलापूरसह काही शहरांमध्ये साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोलापुरात पेट्रोल सुमारे १०४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मात्र प्रीमियम (स्पीड) पेट्रोलच्या दरात सुमारे २ रुपयांची वाढ झाली असून किंमत ११३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

तसेच पुणे शहरातील काही पेट्रोल पंपांवरही अशीच परिस्थिती दिसून आली आहे. नियमित पेट्रोलचे दर स्थिर असले तरी प्रीमियम पेट्रोल महाग झाले आहे. पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही. मात्र दरवाढीच्या चर्चेमुळे काही ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढल्याचेही सांगितले जात आहे.

जागतिक बाजारात दिलासा-
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी प्रति बॅरल ११९ डॉलरच्या आसपास पोहोचलेले दर जवळपास १४ डॉलरने कमी झाले. अमेरिकन क्रूड (WTI) च्या दरातही सुमारे ८ डॉलरची घट नोंदवली गेली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले होते. मात्र तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे बाजारात काहीसा दिलासा मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एकूणच, सध्या सर्वसामान्य पेट्रोल-डिझेल दर स्थिर असले तरी प्रीमियम इंधन महाग झाले आहे. पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक दरांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून साठा करण्याऐवजी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.