
Image Source:(Internet)
नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा फटका दिला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह इतर भागांतही मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्याने गहू, हरभरा, मका यांसारखी रब्बी पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवारपासून हवामानात अचानक बदल जाणवू लागला होता. काही भागांत सकाळीच पावसाला सुरुवात झाली, तर काही ठिकाणी दुपारनंतर वादळी पावसासह गारपीट झाली. चांदूर रेल्वे परिसरात वीज पडल्याची घटना देखील घडली. हवामान विभागाने पुढील काही दिवस अशाच अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
कापणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके या पावसामुळे आडवी पडली असून शेतकरी हताश झाले आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख, सावरा, रंभापुर, वडनेर, कालवाडी, आसेगाव या गावांमध्ये जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले. कांदा, गहू, हरभरा यांसोबतच आंबा पिकालाही फटका बसला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि जळगाव जामोद या भागांत वादळी पावसासह गारपिटीने गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव येथे गारपिटीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, अंजनगाव सुर्जी येथे संत लखमाजी महाराज संस्थानची पारंपरिक गुढीपाडवा यात्रा देखील यंदा अवकाळी पावसामुळे प्रभावित झाली. यात्रेदरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे मंदिर परिसरात चिखल निर्माण झाला आणि हजारो भाविकांचा हिरमोड झाला. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागला.
राज्यातील इतर भागांतही या अवकाळी सरींचा परिणाम जाणवला असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात कापणीसाठी तयार असलेले पीक जमिनीवर कोसळल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी वाढू लागली आहे. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील उपाययोजनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.