
गडचिरोली : जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत बुधवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेने थैमान घातले. रात्री सुरू झालेल्या या वादळाचा प्रभाव गुरुवारी सकाळपर्यंत कायम राहिला, तर काही भागांत पुन्हा वाऱ्यांनी जोर धरत नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले.
हवामान खात्याने आधीच 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी उशिरा वारे वेगाने वाहू लागले आणि बुधवारी सकाळपर्यंत परिस्थिती गंभीर झाली. वादळाच्या तडाख्यामुळे गडचिरोली शहरासह परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही घरांची छपरे आणि दुकानांवरील पत्रे उडून गेली.
जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, धनोरा आणि आरमोरी तालुक्यांमध्येही मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये वाऱ्यांचा वेग प्रचंड असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रब्बी हंगामातील कापणी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतात पडून असलेली पिके भिजली आहेत. हरभरा, गहू, मका, उडीद, मूग, तूर, ज्वारी यांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंबा आणि मिरचीच्या बागांनाही वाऱ्यामुळे फटका बसला आहे.
अनेक शेतकरी मळणीच्या कामात गुंतलेले असताना अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसही हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बाधित भागांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.