Image Source:(Internet)
नागपूर :
सोशल मीडियावर दिसलेल्या आकर्षक दुबई टूर (Dubai tour) पॅकेजच्या जाळ्यात अडकून शहरातील एका व्यक्तीची १ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.
प्रभात सालवे असे पीडित व्यक्तीचे नाव असून, ते जानेवारी २०२५ मध्ये कुटुंबासह दुबई सहलीचे नियोजन करत होते. याच काळात त्यांना Facebook वर ‘नो कॉस्ट ईएमआय’वर दुबई टूर देण्याची जाहिरात दिसली. ही ऑफर ‘PAQ ट्रिप अँड टूर्स’ या नावाने देण्यात आली होती.
जाहिरातीवर विश्वास ठेवून सालवे यांनी संपर्क साधला असता खुदी सॅक्सेना, लक्ष्य अरोरा आणि अमीन अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आकर्षक पॅकेजची माहिती देत विश्वास संपादन करण्यासाठी बनावट व्हिसा कागदपत्रे आणि IndiGo एअरलाईन्सकडून आल्याचा भास होईल असा खोटा ईमेल पाठवला.
या सर्व कागदपत्रांवर विश्वास ठेवत सालवे यांनी दिलेल्या बँक खात्यात १.६८ लाख रुपये जमा केले. मात्र, प्रवासाची वेळ जवळ येताच संबंधितांकडून टाळाटाळ सुरू झाली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.