
Image Source:(Internet)
नंदुरबार : मानवतेला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना जिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. एका महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारता नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून पलायन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
माहितीनुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका गर्भवती महिलेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवान शहा यांनी तपासणी केल्यानंतर ती पूर्णकालीन गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला तातडीने प्रसूती कक्षात हलवण्यात आले.
दुपारी सुमारे ४ वाजून १२ मिनिटांनी महिलेने एका मुलीला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला विशेष निगा विभागात (एनआयसीयू) ठेवण्यात आले. तर आईला पुढील उपचारासाठी दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळाला दूध पाजण्यासाठी तिची आजी रुग्णालयात आली होती. मात्र दुपारनंतर बाळ सतत रडत असल्याने कर्मचाऱ्यांनी आईचा शोध घेतला असता ती वॉर्डमध्ये आढळून आली नाही. संध्याकाळी पुन्हा पाहणी केली असता आईसह आजीही बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले.
रात्रभर शोध घेऊनही त्या दोघींचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित महिलेचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, नवजात मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आईच्या या कृत्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे.