शिरोली एमआयडीसीत भीषण स्फोट; भट्टीचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू, परिसरात घबराट

    20-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका फौंड्रीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल मुकुंद कांबळे (वय ३८, रा. इंगरूळ, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत कामगाराचे नाव आहे.

मंगळवारी (दि. १७) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या आवाजाने आसपासची परिसर अक्षरशः हादरून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कांबळे हे गेल्या सहा वर्षांपासून शिरोली एमआयडीसीतील संबंधित फौंड्रीमध्ये कार्यरत होते. घटनेच्या वेळी ते इतर तीन सहकाऱ्यांसोबत काम करत होते. दरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही क्षणांतच हिट ट्रीटमेंट भट्टीतून जोरदार स्फोट झाला.

या स्फोटाचा तडाखा बसल्याने राहुल कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, शेजारील कंपन्यांमधील कामगार घाबरून बाहेर धावले.

घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शिरोली पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे.

या प्रकरणी शिरोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.