
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यात प्लास्टिकच्या फुलांचा वाढता वापर रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. प्लास्टिकवर आधीच बंदी असतानाही कृत्रिम फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने नैसर्गिक फुल उत्पादकांना फटका बसत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्लास्टिक फुलांवर बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. सजावट व्यवसाय, बँक्वेट हॉल आणि संबंधित आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
या पावलामुळे नैसर्गिक फुलांची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सरकारकडे मागणी करत होते.
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान राज्यभरात 1,24,783 ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3,390 प्रकरणांमध्ये कारवाई करत सुमारे 1.55 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान 67.54 मेट्रिक टन एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. पर्यावरण संरक्षणासोबतच शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा सरकारचा मानस आहे.
हा निर्णय पर्यावरणासाठी लाभदायक ठरणार असून, त्याचवेळी स्थानिक रोजगार आणि कृषीपूरक उद्योगांना चालना देणारा ठरेल, असेही सांगितले जात आहे.