
Image Source:(Internet)
नागपूर : लग्न निश्चित झाल्यानंतर अचानक अटी बदलत रिसॉर्टमध्येच विवाह करण्याची अट घालून तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा प्रकार जरीपटका भागात उघडकीस आला आहे. ही मागणी नाकारल्यानंतर वधू पक्षावर दबाव आणत अखेर लग्न मोडण्यात आल्याने पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, पीडित तरुणीचा विवाह उमेश नीलकंठ देशभ्रतार (रा. कोंढाळी, ता. काटोल) याच्यासोबत ठरला होता. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत साखरपुडा देखील पार पडला होता. मात्र २२ ते २७ फेब्रुवारीदरम्यान उमेशने वारंवार संपर्क साधून लग्न रिसॉर्टमध्येच करावे, अन्यथा तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातल्याचे समोर आले आहे.
या मागणीला त्याची आई निरंजना देशभ्रतार आणि भाऊ हर्षल देशभ्रतार यांनीही पाठिंबा दिल्याचा आरोप असून तिघांनी मिळून संगनमताने हुंडा मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तरुणीने हुंडा देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपींनी विवाह रद्द करत तिचा मानसिक छळ केल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे पीडित आणि तिच्या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, तरुणीने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.