बॉलिवूडवर शोककळा : फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या आईचे निधन

    20-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीचे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या आई गरिमा मल्होत्रा यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या घटनेमुळे मल्होत्रा कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गरिमा मल्होत्रा या मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वास्तव्यास होत्या. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मनीष मल्होत्रा यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सिनेसृष्टीतून श्रद्धांजलीचा वर्षाव-
या दु:खद बातमीची माहिती मिळताच करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर आणि फातिमा सना शेख यांसारख्या अनेक कलाकारांनी मल्होत्रा कुटुंबाची भेट घेतली. सर्वांनी त्यांना धीर देत गरिमा मल्होत्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आईशी घट्ट नातं, प्रेरणेचा आधार
गरिमा मल्होत्रा या मनीष मल्होत्रा यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होत्या. मनीष यांनी अनेक मुलाखतींमध्ये आईबद्दलचे प्रेम व्यक्त करताना तिच्या पाठिंब्यामुळेच आपण या क्षेत्रात यशस्वी झालो, असे सांगितले होते.

लहानपणापासूनच कपड्यांबद्दल असलेली आवड ओळखून आईने त्यांना प्रोत्साहन दिले. आईच्या साड्यांपासून विविध डिझाईन्स तयार करत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

2019 मध्ये वडिलांच्या निधनानंतर आईसोबत त्यांचे नाते अधिक घट्ट झाले होते. 2024 मध्ये ‘मदर्स डे’निमित्त त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत, “माझी आईच माझी ताकद आणि प्रेरणा आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.

गरिमा मल्होत्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.