नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भव्य मिरवणुकीत सहभागी

    20-Mar-2026
Total Views |
 पारंपरिक पेहराव, सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात उत्सवी वातावरण

नागपूर : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेला गुढीपाडवा यंदा नागपूरात अतिशय उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो नागरिकांसह भव्य शोभायात्रेत सहभागी होत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भावना व्यक्त करत सांगितले की, गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी नागपूरातील या उत्सवात सहभागी होणे अत्यंत आनंददायी असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

शहरभर भगव्या पताकांनी सजावट करण्यात आली होती. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात सहभाग घेतल्याने नागपूरात सांस्कृतिक परंपरेची झळाळी दिसून आली.

या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिवत गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शोभायात्रेत विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश होता. विशेषतः रोप मल्लखांबच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. कलाकारांच्या नेत्रदीपक सादरीकरणाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर हेदेखील या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत उत्सवाचा आनंद लुटला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर शहर सणाच्या रंगात पूर्णपणे रंगले होते. ठिकठिकाणी केलेली सजावट, पारंपरिक कार्यक्रम आणि नागरिकांचा उत्साह यामुळे शहरात खऱ्या अर्थाने नववर्षाचे जल्लोषमय स्वागत झाले.