उज्जैनहून नागपुरला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; मामा-भाचा ठार, दोघे गंभीर

    20-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : देवदर्शन आटोपून नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला. मध्य प्रदेशातील बैतूल-हरदा सीमेवरील ढाकना गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत मामा आणि भाचा यांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून नागपूर व कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.

उज्जैनजवळील नलखेड़ा येथील बगलामुखी मंदिरात दर्शन करून चार भाविक नागपूरकडे निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार उलटली. या अपघातात कामठी येथील शुभम उर्फ विजय जायसवाल (२८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर) यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.

या अपघातात अमन जायसवाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना अधिक उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात चालकाला झोप लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी यांनी तत्परता दाखवत जखमींना मदत केली. त्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी काही प्रवासी झोपेत होते.

या हृदयद्रावक घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.