
Image Source:(Internet)
मुंबई : शहरात धमकीच्या घटनांचा सिलसिला सुरू असतानाच मुंबई प्रेस क्लबला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये प्रेस क्लबच्या परिसरात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व निवारण पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने परिसराची तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचालींवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासात कोणतेही संशयास्पद साहित्य आढळून आलेले नाही.
तपासादरम्यान हा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. सायबर माध्यमातून पाठवलेल्या या धमकीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्रोटॉन मेलद्वारे पाठवलेल्या संदेशाचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, याच आठवड्यात BKC Passport Office येथेही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये कार्यालय परिसरात आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइडयुक्त १९ बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण परिसर रिकामा करून तपासणी केली होती. मात्र, कोणतेही स्फोटक आढळले नाही.
या दोन्ही घटनांमुळे शहरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.