अहिल्यानगरातील ॲसिड हल्ल्याचे विधानसभेत पडसाद; स्थगन प्रस्ताव नामंजूर होताच विरोधक आक्रमक !

    20-Mar-2026
Total Views |
आजी-माजी अध्यक्षांमध्ये तणावपूर्ण खडाजंगी
Image Source:(Internet)

मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहा वर्षांच्या बालिकेवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत जोरदार उमटले. या प्रकरणावर तातडीची चर्चा व्हावी, यासाठी विरोधी पक्षाने मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्यातील महिला व लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारांबाबत सरकारला धारेवर धरले. संगमनेरमधील ही घटना अत्यंत धक्कादायक असून, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत सरकारवर तीव्र टीका करण्यात आली. “राज्यात गुन्हेगारांना कोणतीही भीती उरली नाही का?” असा सवालही यावेळी उपस्थित झाला.

विजय वडेट्टीवार यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत, काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “संरक्षण करणारेच जर निष्क्रिय असतील, तर गुन्हेगार मोकाट फिरणारच,” असे ते म्हणाले.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला तातडीने माहिती देण्याचे निर्देश दिले. मात्र, स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले.

भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्ताव हा विरोधकांचा महत्त्वाचा संसदीय हक्क असल्याचे सांगत, प्रस्ताव नाकारल्यानंतरही सदस्यांना मांडणीची संधी देण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट केले. यावर अध्यक्षांनी वेळेची मर्यादा असल्याचे कारण देत ती मागणी नाकारली.

दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग निर्माण झाला. अध्यक्षांवर आरोप केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप असताना, पटोले यांनी आपण केवळ निर्णयाचे स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले. अखेरीस अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हा वाद थांबवला आणि कामकाज पुढे सुरू ठेवले.