मध्यपूर्वेतील युद्धछाया; शेअरबाजाराची घसरणीने सुरुवात, सेन्सेक्स १२०० अंकांनी खाली

    02-Mar-2026
Total Views |
 
Stock market
 Image Source:(Internet)
मुंबई :
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचे तीव्र पडसाद भारतीय शेअरबाजारावर (Stock market) उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे सावट दिसून आले. व्यवहार सुरू होताच BSE Sensex तब्बल १२०० अंकांनी कोसळला, तर NIFTY 50 सुमारे ३०० अंकांनी घसरून २४,८४० च्या आसपास व्यवहार करत होता. सुरुवातीपासूनच बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा ओघ पाहायला मिळाला.
 
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर व्यापक लष्करी कारवाई केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खेमानी अली खामेनी यांच्या मृत्यूबाबतही विविध तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.
 
दरम्यान, जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा Strait of Hormuz तात्पुरता बंद करण्यात आल्याच्या वृत्तामुळे ऊर्जा बाजारात खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय बाजारात Brent Crudeचा दर ८१ डॉलरच्या पुढे झेपावला असून तो गेल्या अनेक महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला आहे.
 
या युद्धजन्य वातावरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायांकडे कल दाखवला. GIFT Niftyमध्ये सुमारे ११० अंकांची घसरण झाली. अमेरिकेतील Dow Jones Industrial Average फ्युचर्स ३५० अंकांनी खाली आले, तर जपानचा Nikkei 225 निर्देशांकही ६०० अंकांनी घसरला. मध्यपूर्वेतील काही शेअरबाजारांनी व्यवहार तात्पुरते स्थगित केल्याची माहिती आहे.
 
सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकींकडे गुंतवणूकदारांनी धाव घेतल्याने मौल्यवान धातूंमध्ये तेजीचे चित्र दिसून आले.
देशांतर्गत बाजारात जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणावर होते. विशेषतः रिअल्टी क्षेत्रावर मोठा दबाव दिसून आला. याशिवाय वाहन, आयटी, बँकिंग, वित्तीय सेवा, एफएमसीजी, फार्मा, मीडिया, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातही १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.
 
भारतासाठी धोक्याची घंटा?
भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने तेलदरवाढीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. इंधनदर वाढ, महागाईचा दबाव आणि रुपयाच्या विनिमय दरात चढउतार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
सध्या तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सावट बाजारावर स्पष्ट दिसत असून, तणाव कायम राहिल्यास आगामी सत्रांमध्येही अस्थिरतेचा कालावधी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.