Image Source:(Internet)
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल (Iran-Israel) संघर्षाचे पडसाद आता भारतीय प्रवाशांवर उमटू लागले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून ठाणे जिल्ह्यातील 23 पर्यटक सध्या दुबई येथे अडकून पडले आहेत. हे सर्व नागरिक 23 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित कार्यक्रमानुसार रविवारी भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य हालचालींमुळे उड्डाणे रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
दुबईत थांबलेल्या प्रवाशांमध्ये कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. 23 जणांच्या गटात 12 ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सामाजिक माध्यमांवर या घटनेची माहिती व्हायरल झाल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तलाठी यंत्रणेला संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी नातेवाईकांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, आखाती देशांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अबुधाबी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागाने हॉटेल व्यवस्थापनांना अडकलेल्या पर्यटकांचा मुक्काम विनामूल्य वाढवण्याच्या तसेच त्यांच्या व्हिसामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित खर्च प्रशासनाकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दुबईतील विमानतळांवर परिणाम झाला असून काही काळासाठी उड्डाणे थांबवण्यात आली होती. शनिवारी दुपारनंतर विमानतळ सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र रविवारी सकाळपासून परिस्थिती तुलनेने स्थिर झाल्याचे समजते. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून दुबईच्या मानव संसाधन आणि अमिरातीकरण मंत्रालयाने पुढील तीन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, दुबईत अडकलेल्या सर्व 23 प्रवाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र व राज्य प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे. युद्धाच्या छायेत परदेशात अडकलेल्या या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे.