Image Source:(Internet)
नागपूर :
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर तणाव शिगेला पोहोचला. या घडामोडींचा परिणाम केवळ संबंधित देशांपुरता मर्यादित न राहता जगभरातील शेअर आणि सराफा बाजारावरही उमटला.
युद्धाच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीच्या दरात मागील दोन दिवसांत मोठी उसळी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने भाव विक्रमी पातळीवर गेले आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
मात्र, या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफा बाजारातून आज दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
१० ग्रॅम सोन्याचा दर (जीएसटीसह) : 1,70,465
चांदीचा दर (प्रति किलो, जीएसटीसह) : 2,96,640
युद्धस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेली नसल्याने येत्या काही दिवसांत दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचा निर्णय घेताना ग्राहकांनी सावध भूमिका घेण्याचे आवाहन सराफा व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
युद्धाचा भडका पुन्हा उडाल्यास सोन्याचे दर आणखी गगनाला भिडू शकतात, अशीही चर्चा बाजारात रंगली आहे. त्यामुळे सध्या झालेली घसरण ही तात्पुरती की दीर्घकालीन, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.