
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील वाढत्या ट्रॅफिक जाम, तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी आदेश जारी करत शहरातील इनर रिंगरोड परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या पिकअप-ड्रॉप आणि पार्किंगवर सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत पूर्ण बंदी लागू केली आहे.
सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात जवळपास २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने धावत आहेत. त्यातच विविध विकासकामांमुळे मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या परिस्थितीत खाजगी ट्रॅव्हल्स बसकडून रस्त्यावरच अनधिकृतपणे प्रवासी उचलणे- सोडणे हे कोंडीचे प्रमुख कारण ठरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
सी.ए. रोड, जाधव चौक, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, वर्धा रोड, अमरावती रोड, उमरेड रोड आणि कामठी रोड या महत्त्वाच्या मार्गांवर खाजगी बस थांबवून प्रवासी चढवणे-उतरण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मिळत होत्या.
शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्स बसची ये-जा होत असून वर्धा रोडवरून सुमारे ६४२, अमरावती रोडवरून १९०, जबलपूर रोडवरून २९६, उमरेड रोडवरून ३०८ आणि भंडारा रोडवरून ९२ बस प्रवास करतात. मात्र, यासाठी स्वतंत्र पार्किंग किंवा अधिकृत पिकअप पॉइंट नसल्याने बस रस्त्यावरच थांबवल्या जातात, ज्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.
नव्या नियमानुसार इनर रिंगरोड परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सना रस्त्यावर पार्किंग आणि प्रवासी चढ-उतार करण्यास पूर्णतः मनाई असेल. तसेच, शहराबाहेरील रिंगरोडवरही ‘नो पार्किंग’ झोनमध्ये बस उभी करण्यास बंदी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, काही सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. राज्य परिवहन (एसटी) बस, MIHAN आणि MIDC भागातील कर्मचाऱ्यांच्या बसेस (परवानगीसह), विवाह किंवा खासगी कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस, अॅम्ब्युलन्स, आपत्कालीन सेवा, शालेय बसेस तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला विशेष आणि देवदर्शन बसना अटींसह मुभा देण्यात आली आहे.
ही अधिसूचना १३ मार्च २०२६ ते १२ मार्च २०२७ या कालावधीत लागू राहणार असून नागरिकांनी मेट्रो, ऑटो आणि टॅक्सी यांसारख्या पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.