
Image Source:(Internet)
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद मध्ये आज धर्मस्वातंत्र्य विधेयकाला बहुमताने हिरवा कंदील मिळाला. यापूर्वी हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर झाले होते. या विधेयकावर शिवसेनाने समर्थनाची भूमिका घेतली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी विरोध दर्शवला.
गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज भासते, म्हणूनच हे विधेयक आणण्यात आले आहे. या मुद्द्यावर विधानसभेत तब्बल सात तास सखोल चर्चा झाली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याआधीच या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार परिषदेतही शिवसेनेच्या सदस्यांनी सरकारच्या भूमिकेला साथ दिली. आमदार अनिल परब यांनी सरकारकडून विधेयकाचा उद्देश आणि जुन्या कायद्यापेक्षा केलेले बदल स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच सचिन अहीर आणि सुनील शिंदे यांनीही या कायद्यामुळे जबरदस्ती व फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरावर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला.
मागील काही वर्षांत देशभरात बळजबरीने किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतराच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर इतर राज्यांच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ लागू करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.
दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आता राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवले जाणार आहे.
सभागृहात रंगली शब्दांची फटकेबाजी-
चर्चेदरम्यान अमोल मिटकरी यांनी हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत भाज्यांच्या रंगावरून टोमणा लगावला. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी “आम्ही हिरव्या भाज्यांनाही भगवा रंग देऊन खाऊ” असे म्हणत वातावरणात विनोदाची फुंकर घातली. सभागृहात यावर एकच हशा पिकला.