विदर्भात हवामानाचा अचानक बदल; नागपूर-भंडाऱ्यासह ८ जिल्ह्यांत पावसाचा इशारा

    18-Mar-2026
Total Views |
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
Image Source:(Internet)

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, १८ आणि १९ मार्चदरम्यान नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूर, भंडारा यांसह एकूण आठ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने इशारा जारी केला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सध्या शहरात दिवस-रात्र उष्णतेची तीव्रता कायम असून उकाड्यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी कूलर आणि एसीचा वापर करावा लागत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत तापमानात घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांत कमाल तापमानात ३ ते ५ अंशांनी घट होऊ शकते, ज्यामुळे वातावरणात काहीसा गारवा जाणवेल. मंगळवारी नागपूरमध्ये कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, हवामानातील या बदलामुळे वादळी वारे आणि अचानक पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.