मुंबई: पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (18 मार्च 2026) सकाळी गंभीर अपघाताची घटना घडली. खोपोलीजवळील नव्या बोगद्यात पाच वाहनांची एकमेकांवर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खोपोली एक्झिटजवळील बोगद्यात अचानक वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत पथक, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांनीही तातडीने मदतकार्य केले.