
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बदलांचे संकेत दिसू लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यापैकी काही जण भूमिका बदलण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी राजधानीत दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत अधिकृतरित्या विकासकामांवर चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं असलं तरी राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन कायदेशीर बाबींचा सुद्धा आढावा घेण्यात आला आहे. योग्य वेळ साधून पुढील पावले उचलण्याची तयारी सुरू असल्याचंही बोललं जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा अस्थिर होण्याची चिन्हे दिसत असून येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.